- दिनेश पठाडेवाशिम - मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यामुळे १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर राज्यभरात अवैध होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वाशिम नगर परिषदच्या वतीने अवैध होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावून ते काढून घेण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. अखेर नगर परिषद प्रशासनाने मंगळवारी शहरातील ८ अवैध होर्डिंग्ज काढून टाकले.
वादळी वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते हे घाटकोपरच्या घटनेवरून समोर आले आहे. वाशिम शहरातही अनेक ठिकाणी परवानगी न घेताच बसविण्यात आल्याचे दिसते. शहरांमधील विविध मार्ग आणि चौकातील होर्डिंग्जचा विषय ऐरणीवर आला आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, मुख्य चौक, राष्ट्रीय महामार्ग, प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरात लावलेले होर्डिंग्ज धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे विना परवानगी लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढून टाकण्यासाठी वाशिम नगर परिषदेच्या वतीने शोधमोहीम राबवून संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने २१ मे रोजी नगरपरिषद वाशिममार्फत शहरातील अवैध होर्डिंग्ज पाडण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ८ अवैध होर्डिंग्जवर बुलडोझर फिरवण्यात आले. ही कारवाई मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक राहुल मारकड, मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे, उपमुख्याधिकारी वसंत पाटील, जितू बढेल स्वच्छता निरीक्षक, अमित घुले, निखिल चव्हाण, योगेश मांदळे, अमोल कुमावत, महेश वानखेडे, नितीन जाधव, चंदू चोपडे, बबन ठाकरे यांच्या पथकाने केली.
अनधिकृत होर्डिंग्जबाबत नोटीसघाटकोपर येथील दुर्घटनेनंतर वाशिम शहरात अनधिकृत होर्डिंग्जची शोधमोहीम पालिकेने राबविण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून काही ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावल्याचे समोर आले आहे. हे सर्व होर्डिंग्ज तत्काळ हटविण्याची नोटीस नगर पालिकेने संबंधितांना दिली.