वाशिम : वाशिम जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत 'ग्रीन झोन'मध्ये असल्याने ४ मे पासून संचारबंदी व लॉकडाउनमध्ये बऱ्याच अंशी शिथिलता मिळताच जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजून गेली. पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही दिवसागणिक कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. वाशिम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असल्याने ४ मे पासून काही व्यवसायाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यास मुभा मिळाली. सकाळी ८ वाजतापासूनच वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत नागरिकांनी विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. पाटणी चौकात सकाळी १० वाजतादरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याचेही दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दुकानात तसेच दुकानासमोर नागरिकांची गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क किंवा रूमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.‘कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घ्या !’४ मे रोजी शिथिलता मिळताच नागरिकांनी वाशिमसह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एकच गर्दी केल्याचे पाहून प्रशासनही हतबल झाले. नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करू नये अन्यथा नाईलाजाने कारवाईची धडक मोहिम पुन्हा एकदा हाती घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने दिला.
जिल्ह्यात ही दुकाने राहणार बंदकेश कर्तनालये, ब्युटी पार्लर, चहा टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे, सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे यावर पूर्णपणे बंदी राहील. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. दारूची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. मात्र, असे आदेश निर्गमित होईपर्यंत दारूची विक्री करणारी दुकाने बंद राहणार आहेत.