रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षात समता फाउंडेशन रिसोड शहराच्या स्वच्छतेवर एक कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा समता फाउंडेशनचे विश्वस्त मधुसुदन अग्रवाल यांनी केली. सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान नगर परिषदेच्या कार्यालयात समता फाउंडेशनचे विश्वस्त मधुसुदन अग्रवाल, प्रख्यात सिने अभिनेता जितु वर्मा उर्फ जोजो , नगराध्यक्ष भारती अरुण क्षीरसागर, तहसिलदार राजु सुरडकर, ठाणेदार राजेंद्र पाटील, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक , ज्येष्ठ नागरिक ,शाळकरी विद्यार्थी, महिला, युवक ,युवती रॅलीमध्ये सहभागी झाले होते .
दरम्यान, समता फाउंडेशन कडुन नगर परिषदेच्या सफाई कामगार यांना टी शर्ट तर महीला सफाई कामगार यांना साडया देण्यात आल्या . ओला व सुका कचरा संकलीत करण्यासाठी शहराच्या मुख्य रहदारीच्या भागात मोठया पस्तीस डस्टबीन ठेवण्यात आल्या आहेत. रॅलीच्या प्रारंभी सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन करुन स्वच्छता रॅलीची सुरुवात करण्यात आली . रॅली आंबेडकर चौक, गुजरी चौक, सराफा लाईन, डॉ.कृष्णचंद्र बबेरवाल चौक, पंचवाट गल्ली, अष्टभुजा देवी चौक , संत अमरदास बाबा मंदीर, आसनगल्ली, शिवाजी चौकातून काढण्यात आली होती .