लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून रॅलीला सुरवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचा समारोप सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. त्याठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माया केदार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे शाखा अधिकारी अॅड. गव्हाणे, जात पडताळणी समितीचे अधिकारी छाया कुलाल व प्राचार्य देशमुख आदिंची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देवून भारतीय संविधानाचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 3:39 PM