संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुपोषित बालक तसेच मातेला उपचार व पोषण आहाराची व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन केलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रातील आहार वितरण अनियमित असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित कंत्राटदाराला समज दिल्यानंतर शुक्रवारी पोषण आहार वितरण झाले.माता व बालकांना पोषण आहार तसेच वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. येथे बालकांना सकाळी दूध, चहा, लाडू, उसळ, फळं, दुपारी भोजन, दर दोन तासांनी पातळ खीर, सायंकाळी दूध व भोजन असा आहार पुरविणे बंधनकारक आहे. हा आहार पुरविताना अनियमितता होत असून, आठवड्यातील काही दिवस आहारच दिला जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. गत आठ दिवसांपासून हा आहार बंद असल्याने रुग्णांची प्रचंड प्रमाणात गैरसोय झाली. याची कल्पना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेली असतानाही पोषण आहार पुरवठा केला नव्हता. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांच्या कानावर टाकला असता, अमरावती येथील बैठक आटोपल्यानंतर दुसर्या दिवशी संबंधित कंत्राटदाराला समज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. १५ फेब्रुवारीला समज दिल्यानंतर १६ फेब्रुवारीला पोषण आहार पुरविण्यात आला. पोषण आहार पुरविण्यात अनियमितता होणे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या कक्षात पिण्यासाठी पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. दरम्यान, पोषण आहार बंद असतानाच्या कालावधीतील पोषण आहाराचे देयक मात्र काढले जात असल्याची माहिती आहे.
पोषण पुनर्वसन केंद्राची जबाबदारी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हे मेळघाटात प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. या केंद्रातील पोषण आहारात खंड पडू नये म्हणून पुरवठादाराला समज देण्यात आली. यानंतरही पोषण आहार नियमित राहावा, यासाठी याप्रकरणी मी जातीने लक्ष देईन. - डॉ. अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.