वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत १५ मे रोजी संपली असून, अद्याप जवळपास २९ हजार शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी व खरेदी बाकी आहे. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे १५ मे रोजी केली.
वाशिम जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला फटका बसला. केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तूरीची खरेदी होत असल्याने जिल्ह्यात नाफेडचे पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४१ हजार ५८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. १८ एप्रिल रोजी नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. त्यानंतर १५ मे पर्यंत तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत ४१ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास १२ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. अंतिम मुदत संपल्यामुळे उर्वरीत २९ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी होणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय झाला आहे. बाजार समित्यांमध्ये तूरीला ३८०० ते ४२०० रुपयाच्या दरम्यान भाव आहेत. हमीभावापेक्षा तब्बल १२०० ते १५०० रुपयाने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यामुळे शासनाने नाफेडच्या तूर खरेदीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरनाईक यांनी मंगळवारी केली.