लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात कोविशिल्ड लस सह कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात आला. त्यात २२ मार्चपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रात २७ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली, त्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १७ हजार ७८१ व्यक्ती होते. शिवाय खासगी लसीकरण केंद्रात १,४२४ ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्तांनी लस घेतली. अर्थात आजवर एकूण २९ हजार २५७ लोकांनी कोरोनाप्रतिबंधक लस घेतली. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात सर्व प्रथम कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका वठविणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झाले. त्यासाठी २२ हजार डोस प्राप्त झाले होते. या मोहिमेत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले असतानाच शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत व्यवस्था करण्यात आली, पुढे ही संख्या वाढवून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू झाले, तर वाशिम शहरात सात खासगी रुग्णालयांत अडीचशे रुपयांत लसीकरण सुरू करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून २९ हजार २५७ व्यक्तींना लस देण्यात आली.(प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:00 PM