लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वाढत्या वीजभारामुळे दिवसाला सरासरी ४० रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात अडचणी येत आहेतच शिवाय बंद पडणाºया रोहित्रांमुळे महावितरणची डोकेदुखीही वाढली आहे. जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीज पुरवठा देण्याच कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमीअधिक दाबामुळे रोहित्र जळण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रांतील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. तथापि, रब्बी हंगामाला सुरुवात होताच या प्रकारात लक्षणीय वाढ होते. सद्यस्थितीत हीच समस्या शेतकरी आणि महावितरणला त्रस्त करून सोडत आहे. रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढली असताना रोहित्रांवर भार वाढून दिवसाला सरासरी ४० तर महिन्याकाठी ७०० ते ८०० रोहित्र नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात विविध वीज उपकेंद्रांतर्गत मिळून २८२ वीज रोहित्र बंद असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.
अनधिकृत जोडण्या आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र दुरुस्त करून ऑईल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.-आर. जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम