- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षभरात जिल्ह्यातील ५४३ जणांना सापाने दंश केला असून, यापैकी दोन जणांचा जागीच तर एका जणाचा अकोला येथे उपचारासाठी जात असताना मध्येच मृत्यू झाला. सापाने दंश केल्यानंतर मृत्यू ओढवण्याच्या घटनेत कमालिची घट झाली आहे.साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात शेतात साप चावण्याच्या घटना घडतात. सापापासून बचाव म्हणून शेतात काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात विषारी सापाच्या केवळ चार प्रजाती असून काही निमविषारी साप वगळता जिल्ह्यात प्रामुख्याने धामण, दिवड, कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, तस्कर, नानेटी, धूळनागीण, कुकरी, सळई इत्यादी बिनविषारी साप आढळून येतात. अनेकवेळा घाबरून किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी साप चावतो. गत वर्षभरात जिल्ह्यात ५४३ जणांना सापाने दंश केला. यापैकी दोन जणांचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मेडशी येथील एकाचा अकोला येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. साप हा शेतकºयांचा मित्र म्हणून ओळखला जात असल्याने घराजवळ तसेच शेतात साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचे संवर्धन करण्यास मदत करा, असा सल्ला सर्पमित्र, डॉक्टरांनी दिला.
जिल्ह्यात वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. दवाखान्यात आल्यानंतर योग्य उपचार करून सर्पदंश झालेला व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता शक्य तेवढ्या लवकर नजीकच्या दवाखान्यात उपचारार्थ जावे.- डॉ. अनिल कावरखेवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम