लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, ५६५३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. आतापर्यंत २२०० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले असून, त्याचे अहवाल काय येतात, याकडे लक्ष लागून आहे.कोरोनामुळे यंदा शैक्षणिक सत्रात शाळा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यानंतरही कोरोनाचा उद्रेक सुरूच राहिल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे सुतोवाच यापूर्वीच राज्य शासनाने केले होते. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तत्पूर्वी आवश्यक ती खबरदारी म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात ४१८५ शिक्षक तर १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यापैकी गत तीन दिवसात जवळपास २२०० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसात उर्वरीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या शिक्षकांना काही दिवस घरीच राहावे लागणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोनाविषयक चाचण्या केल्या जात आहेत. कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक येथे कोरोना चाचण्या केल्या जात आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत चाचण्या केल्या जाणार आहेत. - डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक