वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत सहा तालुक्यांपैकी केवळ एक तालुका हागणदरीमूक्त झाला असून, येत्या २५ जानेवारीपर्यंत दुसरा तालुका हागणदरीमूक्त करण्याचे निर्देश जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रशासनाला दिलेले आहेत.
वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग शौचालयांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिवाचे रान करीत आहे; परंतु अद्यापही त्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. आजवर जिल्ह्यातील केवळ कारंजा तालुका हागणदरीमूक्त करण्यात प्रशासनाला यश आले असून, आता येत्या २५ जानेवारीपर्यंत मंगरुळपीर तालुका हागणदरीमूक्त करण्याचे कठोर निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी संंबंधितांना दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शौचालयांचे उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना, जनजागृती, गृहभेटी, कुटूंबस्तर संवाद कार्यक्रम घेण्यासह गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकांद्वारे उघड्यावरील शौचवारी रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना बव्हंशी यश मिळाले असले तरी, शौचालयांची उद्दिष्टपूर्ती होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत कारंजा तालुक्यातील शौचालयांची उद्दिष्टपूर्ती होऊन हा तालुका हागणदरीमूक्त घोषीत करण्यात आला आहे. त्यानंतर स्वच्छता मिशन कक्षाने मंगरुळपीर तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी ७० ग्रामपंचायती हागणदरीमूक्त झाल्या, अर्थात या ग्रामपंचायतींनी शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता उर्वरित दोन ग्रामपंचायतींमधील शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात असून, ती येत्या तीन दिवसांत पूर्ण क रण्याचे आव्हान लाभार्थींबरोबरच प्रशासनापुढेही आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतरच २६ जानेवारी रोजी मंगरुळपीर तालुका हागणदरीमूक्त घोषीत करता येणार आहे. त्यामुळे मंगरुळपीर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाकडून या तालुक्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.