वाशिम: विद्यूतवर होणाºया खर्चात बचत व्हावी तद्वतच अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या मूळ उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर लाखो रुपये खर्चून सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून दुरूस्तीअभावी ते बंद असल्याने महावितरणच्या विजेवरच जिल्हा कचेरीचा कारभार चालत असून महिन्याकाठी एक ते सव्वा लाख रुपयांचे देयक भरावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.
पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर कमी होऊन अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून सर्वंकष प्रयत्न केले जात असून कोट्यवधी रुपये खर्चून विविध स्वरूपातील योजनाही अंमलात आणल्या जात आहेत. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडूनच अपारंपरिक ऊर्जा वापराकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाशिममध्ये दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आलेले असून बाहेर पवनचक्की स्थापित करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही अपारंपरिक ऊर्जास्त्रोत नादुरूस्त असल्याने महावितरणची वीज वापरली जात आहे. त्यासाठी महिन्याला एक ते सव्वा लाख रुपयांचे देयक भरावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याकडे विद्यमान जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.