- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्ण दुपटीचा वेग (डबलिंग) २३३ वरून ४२ दिवसांवर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढविणारी असून, आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे.जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण मेडशी ता. मालेगाव येथे आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख कमी होत गेला. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले,. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. दैनंदिन हजारावर चाचण्या होत असून सरासरी २०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्ण दुपटीचा वेग २३३ दिवसांवरून ४२ दिवसांवर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा असून, सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोना रुग्ण दुपटीचा वेग ४२ दिवसांवर गेला असून, यापूर्वी हा वेग २३३ दिवस असा होता. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.- डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावी करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील कोरोनाविषयक नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.-शण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी, वाशिम.