लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यास महिन्यात अर्थात ३० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाच्या २६.३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहेच शिवाय जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली आहे.वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यांत सरासरी ७९८ मि.मी. पाऊस पडतो, तर गतवर्षी सरासरी जून ते आॅक्टोबरदरम्यान जिल्ह्यात ८४२.४२ मि.मी. पाऊस पडला. प्रत्यक्ष गतवर्षी १ जून ते ३० सप्टेबरदरम्यान केवळ ६९२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात गतवर्षीच्या पावसाळ्यात ३० सप्टेंबरपर्यंत १०६ मि.मी. पावसाची तूट होती, तर गतवर्षी १ जून ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील सहाही तालुक्यात मिळून ९१. ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी १ जून ते ३० जूनदरम्यानच सरासी २२१.९४ पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास अडीच पट आहे. त्यात २९ ते ३० जूनपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात १४.६३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा आधार झाला आहेच, शिवाय बहुतांश जलस्त्रोतांतील पातळीतही चांगली वाढ झाली आहे.
नऊ दिवसांत ९६ मि.मी. पाऊसजिल्ह्यात यंदा १ ते ३० जूनपर्यंत सहा तालुक्यात मिळून सरासरी २२१.१४ मि.मी. पाऊस पडला असला तरी खऱ्या अर्थाने मागील १० दिवसांतच पावसाने जोर धरला आहे. त्यात २२ जून ते ३० जूनदरम्यानच्या ९ दिवसांतच ९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २२ जूनपर्यंत जिल्ह्यात १२५.९४ मि.मी. पाऊस पडला होता.