वाशिम : जिल्हय़ात साथीच्या आजाराने डोके वर तर काढलेच शिवाय अज्ञात आजाराने संपूर्ण जिल्हा फणफणल्याचे चित्र जिल्हय़ातील खासगी व शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येते. वाशिम शहरातील काही दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी जागाच नसल्याने त्यांना भरती न करताच उपचार करून पाठवून दिल्या जात आहे. मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात अचानक रुग्णसंख्येत वाढ होऊन दररोज पाचशेच्यावर, तर रिसोड येथे एक हजाराच्यावर रुग्णांवर तपासणी केल्या जात आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून, नोंदणीकरिता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठय़ा प्रमाणात गर्दी आहे. काही दिवसांआधी वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत असल्याने रुग्णालयात गर्दी वाढल्याचे आरोग्य विभागाने कळविले होते; मात्र सध्या साथीच्या आजारासह अज्ञात आजाराने डोके वर काढले असून, थंडी ताप, व पेशी होण्याच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. बालकांची आरोग्य प्रतिकार क्षमता कमी असल्याने सर्वाधिक रुग्ण बालक दिसून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केल्या जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण साथीचे आजाराचे दिसून येत आहेत. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सूज येणे या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत. तसेच धूरफवारणी प्रकारच जिल्हय़ात होत नसल्याने यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. यामुळे मेंदूचा हिवताप, उलट्या, नाक व तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे रक्तादाब कमी होणे यासारखे आजार कमी प्रमाणात दिसून येत असले तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात धूरफवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघड्यावरील तळलेले पदार्थ टाळावे, रेफ्रीजेटरमधील खाद्य पदार्थ टाळावे, हवेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो सकाळी घरीच थांबावे. अस्थमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी या दिवसाची घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांसह योगा व श्वसननाचा व्यायाम करावा आणि पाणी शुद्ध करून जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डेंगी ताप, मलेरिया, डायरिया, सर्दी, ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फिवर, डेंगी शॉक, सिड्रोम या आजाराची लागण होऊ शकते. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून फाँगिग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून सदर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या दिवसात सर्वात जास्त आजाराचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्या लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला व तापाच्या आजारानी ग्रासले आहे. बालकांना श्वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयांसह शहरातील बाल रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हय़ातील सर्वच दवाखाने हाऊसफुल असल्याने व ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे.
वाशिम जिल्हा तापाने फणफणला!
By admin | Published: September 16, 2014 6:47 PM