वाशिम : कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी गत सहा महिन्यांत जिल्हा परिषद प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेची फलश्रूती झाली असून, कुपोषण निर्मूलनात राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. पाच महिन्यात ११५७४ बालके कुपोषणमुक्त झाली असून, याची सरासरी टक्केवारी ७३ आहे.
कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी सन २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले. अधिकाऱ्यांनी कुपोषणग्रस्त बालके दत्तकही घेतली होती. परंतू, कुपोषणमुक्तीच्या या लढ्याला अपेक्षित यश आले नव्हते. जानेवारी २०२४ नंतर मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी या कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी ठोस त्रिसूत्री कार्यक्रम आखला.
येणाऱ्या १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा उपोषण मुक्त करण्यासाठी सीईओ वाघमारे यांनी महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयातून फेब्रुवारी महिन्यापासून कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यावेळी जिल्ह्यात सॅम, मॅम, एसयुडब्ल्यु आणि एमयुडब्ल्यु या चार प्रकारातील एकुण कुपोषित बालकांची संख्या १३ हजार ५१५ होती. मागील पाच महिन्यांत राबविलेल्या या मोहिमेची फलश्रूती आता दृष्टिपथास येत असून, ११५७४ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. आता १९४१ बालके कुपोषित आहेत. त्यातही अति तीव्र श्रेणीतील (सॅम) कुपोषित बालकांचे प्रमाण तीन तालुक्यात शुन्यावर आले असुन उर्वरित तीन तालुक्यामध्ये सॅम श्रेणीत १६ बालके आहेत. ‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरल्याने नागरिकांमधून जिल्हा परिषद प्रशासनाप्रती कौतुकास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.
कुपोषण निर्मूलनाच्या या मोहिमेत मालेगाव आणि वाशिम तालुक्याने आघाडी घेतली आहे. उर्वरित तालुक्यांनीही असेच काम केल्यास येणाऱ्या १५ ऑगस्टपूर्वी वाशिम जिल्हा संपूर्णपणे कुपोषण मुक्त होईल असा विश्वास वाटतो.- वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
एकूण कुपोषित बालकांचा तुलनात्मक तक्ता
तालुका / जानेवारी २०२४ / जून २०२४
वाशिम / २१५२ / ३३रिसोड / १८६१ / ४५२मालेगाव / ३५८१ / ७४मं.पीर / १४८३ / ४००कारंजा / १५६० / १८६मानोरा / २८७८ / ७९६एकूण /१३५१५ / १९४१