वाशिम: राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतील कामगारांची मजुरी अदा करण्यासाठी लागू गेलेल्या ‘पीएफएमएस’ (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) अंतर्गत कामगारांच्या खात्यांना आधार जोडणीला विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित कामगारांना वेळेवर मजुरी अदा करणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल माहितीनुसार जिल्ह्यातील १.६५ लाख मजुरांपैकी ५० टक्के कामगारांच्या खात्यांना आधार क्रमांक जोडणी झाल्याचा अहवाल बँकांकडून प्राप्त झाला नाही.
वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत १२ हजारांहून अधिक कामे करण्यात येत आहेत. या कामांवर कार्यरत जॉबकार्ड धारक कामगारांना त्यांची मजुरी वेळेवर मिळावी आणि यामध्ये पारदर्शक ता असावी, म्हणून शासनाने पीएफएमएस पद्धती लागू केली आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि या प्रणालीनुसार कमगारांना त्यांचे बँक खाते आधारशी जोडण्याबाबत सुचना करण्यात आल्या. त्यासाठी कामगारांना त्यांचे खाते असलेल्या बँकांकडे आधारक्रमांक सादर करावे लागणार होते. तथापि, कामगारांकडून या प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना मजुरी अदा करण्यात विलंब होत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील विविध बँकांकडून आजवर एकूण १.६५ लाखांहून अधिक मजुरांपैकी ५० टक्के कामगारांच्या खात्याला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत. आता उर्वरित कामगारांनी बँकांकडे आधार क्रमांक सादर केले की नाही, ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे शासनाकडून रोहयोच्या कामांसाठी प्राप्त निधी बँकांकडे वळता केला तरी, प्रत्यक्ष आधार क्रमांकाअभावी संबंधित कामगारांच्या खात्यात वेळेवर रक्क्कम जमा होणे कठीण जात आहे.
अपुरा निधी
जिल्ह्यात रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांसाठी शासनाकडून निधीला मंजुरी देण्यात येत असली तरी, तो निधी वेळेवर प्राप्त होत नाही. एकूण मंजूर निधीपैकी काही रक्कम प्राप्त झाल्यानंतर रोहयोच्या कामगारांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा करण्यात येते. तथापि, निधी अपुरा असल्याने बँकांकडे फंड ट्रान्सफर आॅर्डर दिल्यानंतरही संबंधितांच्या खात्यात मात्र रक्कम जमा होऊ शकत नसल्याचे कळले आहे. शासनाच्या विविध घरकूल, योजनेसह, रोहयोच्या विहिरी आणि इतर कामांवर कार्यरत असलेल्या शेकडो मजुरांना त्यामुळे मनस्ताप होत आहे.
विविध बँकांकडून प्राप्त अहवालानुसार जवळपास ६५ टक्के कामगारांच्या खाते आधारक्रमांकाशी जोडले आहेत. उर्वरित कामगारांनीही आपले आधार क्रमांक सादर केले असतील; परंतु प्रत्यक्ष किती कामगारांनी आधार क्रमांक दिले नाहित. ते बँकांच्या अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, यामुळे मजुरी खात्यात टाकण्यास अडचणी येत असल्या तरी, कामगारांची मजुरी मात्र फार दिवस प्रलंबित राहत नाही. - सुनील कोरडे,उपजिल्हाधिकारी, (रोहयो), वाशिम.