लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सोमवार, ७ जूनरोजी नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातुलनेत १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या खाली उतरला आहे. या आशादायक चित्रामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, कोरोना संसर्गाचे संकट ओसरू लागल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. ती तुलनेने अधिक तीव्र ठरली. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच गेली. मध्यंतरी दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ३०० ते ४०० पेक्षा अधिकच राहिला; मात्र २८ मे पासून कोरोनाचे संकट हळूहळू ओसरायला लागल्याचे दिसून येत आहे. १ जूनपासून दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभराच्या खाली उतरली आहे; तर ७ जूनरोजी केवळ ५६ जण कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे. दुसरीकडे ‘ॲक्टिव्ह’ अर्थात शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. ७ जूनच्या अहवालानुसार जिल्हाभरात केवळ ८८२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत; तर आज कोरोना संसर्गाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ७ जूनरोजी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहर व तालुक्यात २०, मालेगाव शहर निरंक; तर तालुक्यात केवळ ३, रिसोड शहर निरंक व तालुक्यात ५, मंगरूळपीर शहर निरंक व तालुक्यात ७, कारंजा शहरात ५; तर तालुक्यात ६ आणि मानोरा शहर निरंक व तालुक्यात केवळ ५ रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्ह्याबाहेरील पाच बाधितांचीही नोंद घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ओसरत चालले असले, तरी नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 11:40 AM