वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रिसोड येथे फेब्रुवारी महिन्यात काही युवकांनी एकत्र येऊन दिवसागणिक वाढत चाललेल्या गौणखनिज चोरीप्रकरणी कारवाईची मोहिम हाती घेण्याच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. मात्र, या गंभीर मुद्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष पुरविलेले नाही. रेती, गिट्टी, ढब्बर आदी गौण खनिजाची सर्रास चोरी होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. ंयंत्रणेतीलच काही निर्ढावलेल्या कर्मचाºयांच्या सहाय्याने एकाच पावतीवर अनेकवेळा गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागातील वरिष्ठांचे मात्र याकडे लक्ष नसल्याने संबंधितांचे चांगलेच फावत असल्याबाबत या युवकांनी प्रशासनाला अवगत केले होते. त्याऊपरही कुठलीच कारवाई नसल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असून रिसोडप्रमाणेच जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा आणि मालेगाव या तालुक्यांमधूनही गौणखनिज चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
गौणखनिज चोरीप्रकरणी त्या-त्या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्यास जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पावले उचलून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. याकामी मात्र नागरिकांचेच सहकार्य अपेक्षित आहे. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम