वाशिम : जिल्ह्यातील शिक्षकांना महिन्याच्या १५ तारखेपर्यंतही वेतन मिळत नव्हते. त्यामुळे हा घटक त्रस्त होता. मात्र, ही समस्या आता दूर झाली असून, सीएमपी प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना प्रथमच १ तारीख येण्यापूर्वीच वेतन मिळाले आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विविध स्वरूपातील अडचणींमुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत होता. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांचे वेतन थेट बॅंक खात्यात अदा करण्यासाठी फास्ट सीएमपी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. रायगड, पुणे, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सिंधूदुर्ग, वर्धा आणि वाशिम या नऊ जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित व अंशत:अनुदानित शाळांतील शिक्षकांसह पुणे व कोल्हापूर विभागातील महानगर पालिका, नगर पालिका, कटक मंडळांच्या शाळांतील शिक्षकांना माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन याच प्रणालीने करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी १४ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असून शिक्षकांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे वेतन महिना संपण्यापूर्वीच, २८ सप्टेंबरला जमा झाले.