लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी जून २०१८ या महिन्यात राज्यशासनाने ‘प्लास्टिक’ आणि ‘थर्माकोल’वर सक्तीने बंदी लादण्याचा कायदा केला. सुरूवातीच्या काळात वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्तरावर प्रशासनाने या कायद्याची चोखपणे अंमलबजावणी करत व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाया देखील केल्या. मात्र, सद्या ही मोहीम पूर्णत: थंडावली असून प्लास्टिक कॅरीबॅग्ज आणि थर्माकोलच्या सर्वच वस्तूंचा वापर वाढला असून कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक बंदी कायद्यान्वये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, काच, ग्लास, स्ट्रॉ, तसेच थर्माकोलचे ताट, ग्लास, वाट्या आणि उत्पादने साठविण्यासाठीची प्लास्टिक आवरणे, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक, सजावटीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ नुसार या कायद्याचा भंग करणाºयास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसºया वेळी १० हजार रुपये आणि तिसºया वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व तीन महिन्यांची कैद अशा शिक्षेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने कायदा अंमलात आल्यानंतर प्रारंभीच्या काही दिवसांमध्ये वाशिम जिल्ह्यात नगर पालिका, नगर पंचायत स्तरावर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. सद्या मात्र कारवाईची ही मोहिम पूर्णत: थंडावली असून बाजारपेठेत प्लास्टिक कॅरीबॅगचा; तर जेवणावळ्यांमध्ये प्लास्टिक ग्लास, थर्माकोलचे द्रोण आदिंचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात प्लास्टिक, थर्माकोल बंदीच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 4:17 PM