लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चवथ्या क्रमांकावर होता.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ११३३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५९२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १९० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे.जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.