लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ८८ हजार ७८६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या टक्केवारीचा विचार करता वाशिम जिल्हा अमरावती विभागात अग्रेसर ठरत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे १ लाख ८९ हजार ५३२ इतकी आहे. यापैकी ८८ हजार ७८६ व्यक्तींचे म्हणजेच ४७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यातील ६० वर्षांवरील व्यक्तींचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘कोविन’ ॲपवर रोज रात्री ९ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या सोयीसाठी सद्यस्थितीत वाशिम येथील सामान्य रुग्णालयामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला.
६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या टक्केवारीचा विचार करता वाशिम जिल्हा अमरावती विभागात अग्रेसर ठरत आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव म्हणून १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी