भारत सरकार ‘वन टॅक्स वन नेशन’ या धर्तीवर वेगवेगळे संपूर्ण कर रद्द करून एक २०१७ मध्ये नवीन कर प्रणाली जीएसटी सुरू केली. यामध्ये ३ ते २८ टक्के कर आकारणी निर्धारित केली. याला त्यांनी एकच टॅक्स असे म्हटले, परंतु ज्या दिवसापासून कायदा अमलात आला त्यादिवसापासून आजपर्यंत ९८७ दुरुस्त्या करून रोज नवनवीन सुधारणांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना, टॅक्स प्रॅक्टिशनर यांना वेठीस धरले आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील ८.५० कोटी व्यापाऱ्यांनी २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आयोजन केले आहे. वाशिम जिल्ह्यातील काेरोना स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरुन वाशिम जिल्हा बंद राहणार नाही, परंतु एका निवेदनाव्दारे आपला निषेध व्यक्त करून भारत बंदला वाशिम जिल्ह्याचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा कॅटचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव मनीष मंत्री, आनंद गडेकर, पुरण बदलानी, युवा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भरत चंदनाणी, टॅक्स प्रॅक्टिशनर असो. अध्यक्ष ॲड. अरुण केला, सचिव ॲड. सुरेश टेकाळे, सिए आनंद डोडिया, सिए आनंद चांडक, सिए बालकिसन बाहेती, ट्रान्सपोर्ट असो. अध्यक्ष बबलूखान, सचिव सैय्यद रहेबर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...............
दुकाने बंद न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम जिल्हातील काेरोना स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून वाशिम जिल्हा बंद राहणार नाही. तरीसुध्दा या आंदाेलनाला जिल्हा व्यापारी संघाने पाठिंबा दर्शवून संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात येणार आहे.