- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेत जिल्ह्याला अकोला, जालना, अमरावती आदी ठिकाणावरून ऑक्सिजनचा पुरवठा झाला. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट नसल्याने ऑक्सिजनबाबत इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने, यासंदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करीत शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेत पाठपुरावा सुरू ठेवला. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित झाला. दुसऱ्या लाटेत खासगी कोविड रुग्णालयांत अनेक रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहावे लागले. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे तिपटीने आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. या अनुषंगाने तिसऱ्या लाटेत दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजननिर्मितीचे तीन प्लांट साकारले असून, कारंजा येथील एक प्लांट पूर्णत्वाकडे येत आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक प्लांट साकारला जाणार आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्यात आले. दुसऱ्या लाटेत दैनंदिन ७ मे.टन ऑक्सिजनची गरज भासली होती. सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन बेडची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.- शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम