राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दूरवरून पाणी आणण्याची कसरत बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिकांना करावी लागत आहे. आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा येथे एकही सार्वजनिक अथवा खासगी विहीर किंवा कुपनलिका नाही. गावाचा बहुतांश भूभाग हा डोंगर, द-या खो-याने व्यापलेला आहे. खडकाळ भाग असल्याने परिसरात जलस्त्रोत नाहीत. गावानजीक असलेल्या बेंदाडी नामक नदीच्या पात्रातील डोहावरून वापरायचे पाणी आणावे लागते तर गाव तलावाच्या भिंतीलगत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाते.
मात्र, नदी पात्रातील डोह हिवाळ्यातच कोरडेठण्ण पडतात तर गाव तलावातील जलसाठा संपत येताच विहिरीतील पाण्याचे पाझरही बंद पडतात. यामुळे गावक-यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सद्यस्थितीत ब्रेक के बाद अपुरा जलसाठा येत असल्याने त्या पाण्यासाठी अबालवृद्धांना एक किमी अंतरावर घाटमाथ्याचा रस्ता चढून उन्हातान्हात पाणी आणावे लागत आहे. कायमस्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. वनविभागाचे कचाट्यात अडकलेला गाव तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे.
या तलावाच्या भिंतीची उंची वाढल्यास साहजिकच तलावातील जलसाठ्यात वाढ होईल, यात शंका नाही. गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणून गावक-यांना तहान भागवावी लागत आहे. सुदी संग्राहक तलावावरून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावक-यांनी केली.