वाशिम - एकीकडे शासन वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती करीत असतांना जिल्हयातचं दुसरीकडे झाडे जाळण्याच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे शिरपूर - मालेगाव रस्त्यावर दिसून आले. याकडे बांधकाम विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
दिवसेंदिवस झाडाची संख्या झपाटयाने कमी होत असतांना शासनाच्यावतिने वृक्षरोपण व संगोपनाबाबत सर्वस्तरावर जनजागृती केल्या जात आहे. वाशिम जिल्हयातही वृक्ष लागवड मोहीम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड सुध्दा करण्यात आली. त्याचे संगोपन तर दुरच भव्य असे व अनेक वर्षांपासून असलेल्या झाडांना आग लावण्याचा प्रकार होत असतांना याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शिरपूर ते मालेगाव रस्त्यावर मोठ मोठे ३० ते ३५ वर्ष जुने झाडे डोलात उभे आहेत. काही शेतकरी, काही वृक्षांची तस्करी करणारे इसम झाडांच्या बुध्यांना आग लावून तर काही शेतकरी वणवा पेटून देतांना झाडांना याची बाधा होईल याचा विचार करीत नसल्याने वृक्षांना आग लागत आहे. परंतु हे सर्व होत असतांना बांधकाम विभागाने अद्याप याबाबत पाऊले उचललेली दिसून येत नाहीत. तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून नष्ट होणारी वनसंपदा जपणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया वनप्रेमींमधून व्यक्त केल्या जात आहेत.