- दिनेश पठाडेवाशिम - पिपंळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली. संत्रा बागेतून गेल्यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले, मात्र यातूनही अपेक्षित कमाई झाली नाही; परंतु अचानक संत्र्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. दहा लाख रुपये किमतीची संत्री फक्त अडीच लाख रुपयांमध्ये देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. संत्रा बागेतून काहीच उत्पन्न शिल्लक राहत नसल्यामुळे शेतकरी जुबेर खान नूरखान यांनी मोठमोठ्या संत्रा झाडावर जेसीबी चालवला. सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत झाडांची देखभाल करणे, वेळोवेळी महागडी खते देणे, फवारणी यासाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. लागवड खर्चही निघत नसेल तर ही संत्रा झाडे न ठेवलेलीच बरी म्हणत लहान मुलांप्रमाणे संगोपन केलेल्या संत्रा बागेवर जेसीबी चालविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. कवडीमोल भावात मागणीमृग बहार फुटेल या अपेक्षेने त्यावर खर्च केला जातो; परंतु निसर्गाचा लहरीपणामुळे कित्येकदा बागेत चांगली फूट होत नाही. त्यामुळे पूर्ण वर्ष खाली जाते अन् चांगली फूट झालीच तर लाखो रुपयांच्या संत्रा बागेला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात मागितले जाते. त्यामुळे या दुहेरी असमतोलामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित पूर्णतः बिघडते. सर्व्हे क्र. ७४ मध्ये दहा वर्षांआधी चार एकर क्षेत्रात पाचशे संत्रा झाडे लावली होती. सहा वर्षे होईपर्यंत त्याचे चांगले संगोपन केले. पंधरा फूट एवढ्या उंचीची डोलदार झाडे बनली; परंतु गेल्या चार वर्षंपासून लावलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे सर्व झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकायचा निर्णय घेतला. जुबेरखान नूरखान- शेतकरी, पिंपळगाव बु.
Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली
By दिनेश पठाडे | Published: May 08, 2024 5:03 PM