- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक अविरोध पार पडल्यानंतर, आता चार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान, सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे.वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, सभापती पदासाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंची युती झाल्याने सदर निवडणूक अविरोध झाली. हाच फॉर्म्यूला चार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं या चारही पक्षाच्या वाट्यावर प्रत्येकी एक सभापती पद येणार आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणती समिती द्यावयाची तसेच कुणाला सभापती पदी विराजमान करायचे याचा गुंता अद्याप सुटला नाही. सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राकाँचे अध्यक्षपद माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे गटाकडे आल्याने सभापती पद माजी आमदार प्रकाश डहाके गटाकडे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसमधून माजी पदाधिकाऱ्यांना सभापती पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम घोषित झाला नाही. महाविकास आघाडी व भारिप-बमसं पक्षाच्या समन्वयातून विषय समिती सभापती पदाची निवडणूकही अविरोध करण्यावर भर आहे.- चंद्रकांत ठाकरे,अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम
वाशिम : जिल्हा परिषद सभापती पदासाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 2:22 PM