लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार, २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्यास वाशिम जिल्हा देखील अपवाद नाही. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांना शहरांतर्गत स्वच्छता राखण्याकामी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी देखील मिळाला. प्रत्यक्षात मात्र आजघडिला अभियानाचा कुठलाच उद्देश सफल झाला नसल्याचे ठायीठायी निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांतर्गत उघड्यावरील शौचविधीस कायमचे बंद करणे, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करणे, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, आदी घटकांवर काम होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांनी शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशांनाच हरताळ फासला आहे. सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांची स्वच्छता, तुलनेने अधिक खराब झालेल्या रस्त्यांचे नुतनीकरण; तर काही प्रमाणात खराब झालेल्या रस्त्यांची डागडूजी, यासारखी मान्सूनपुर्व कामे एकाही नगर परिषद कार्यक्षेत्रात झाली नाहीत. परिणामी, सद्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.
वाशिम : बाजारपेठ घाणीने; रस्ते माखले चिखलाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:54 PM
वाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली.
ठळक मुद्देबाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.