- संतोष वानखडेवाशिम - महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले.
या मेळाव्याला भाजपाचे आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शाम बढे, माजी आ. ॲड. विजयराव जाधव, भाजपा युवानेते ॲड. नकूल देशमुख, वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे समन्वयक राजू पाटील राजे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कारंजाचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे, विजय खानझोडे, रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह महायुतीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. देशात व राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), व इतर मित्रपक्ष असलेल्या महायुतीने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, त्याअनुषंगाने जिल्हास्तरावरही संयुक्त मेळावा घेण्याच्या सूचना वरिष्ठस्तरावरून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वाशिमला १४ जानेवारी रोजी संयुक्त मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून आगामी निवडणुका एकदिलाने व एकजुटीने महायुती लढविणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात व देशात महायुती भक्कम असून, केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.
खासदार भावना गवळी अनुपस्थित का?या संयुक्त मेळाव्यात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अनुपस्थित होत्या. त्या कशामुळे अनुपस्थित आहेत, याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिली. यवतमाळ व वाशिमचा कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने आणि वाशिम हे माझं घर आहे, त्यामुळे यवतमाळला जाणे आवश्यक असल्याचे खासदारांनी सांगितल्याने त्या वाशिमच्या या मेळाव्यात उपस्थित राहू शकल्या नाहीत, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.