वाशिम: जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्याा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानाची दखल घेत शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकºयांना लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, फळपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक बाधित गावांमध्ये जाऊन नुकसानाचे पंचनामे करत असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली आहे. ही मदत लवकरात लवकर शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंचनामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक पिकाचा पंचनाम्यात समावेश होईल, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.