वाशिम: वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत या संघटनेच्या कोलार येथील शाखेने ग्रामस्थांना पर्यावरण व वन्यजीव रक्षणासह सर्पदंश आणि त्यावरील उपायांबाबत सोमवारी रात्री मार्गदर्शन केले.
कोलार येथे रात्री ९ वाजता पर्यावरण व वन्यजीव संरक्षण या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमात मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी विद्यार्थी तसेच गावकरी मंडळींना वन्यजीव रक्षण ,वन संवर्धन, पर्यावरण रक्षण, तसेच सर्पदंश व त्यांवरील उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी गौरवकुमार इंगळे म्हणाले, की वाघ वाचवा या घोषणेवर आज समाजातील सर्व स्तरावरून प्रतिसाद मिळतोय,पण रान वाचले तरंच वाघ वाचतील. जगातील सर्वच पर्यावरणवादी संघटना यासाठी प्रयत्न करीत आहेत, अशात वाशिम जिल्ह्यात हा विचारप्रवाह रूजवून जास्तीत जास्त नवयुवकांनी पर्यावरण संरक्षणाचे कार्य करावे व मानव वन्यप्राणी संघर्ष टाळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमात वन्यप्राण्यांसह सापांविषयी माहिती देणारी ध्वनीचित्रफित ग्रामस्थांना दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरूळपीरचे अध्यक्ष गणेश गोरले,सुबोध साठे, कुणाल ठाकूर, शरद दंडे तसेच गावातील प्रतिष्ठीत प्रदिप ठाकरे, रवी सावळे, आणि वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरूळपीर शाखा कोलार येथील संदीप ठाकरे, श्रीकांत डापसे, उमेश जंगले, गौरव पुसदकर, नंदू सातपुते, प्रविण आंबोरे, अतुल डापसे, विवेक तिहीले, आदि मान्यवर उपस्थित होते.