- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सध्या हिवताप, डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असून, लवकर निदान व्हावे, याकरिता रक्त नमुने चाचणीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. डेंग्यू चाचणीसाठी जिल्ह्यात शासकीय प्रयोगशाळा नसल्याने आणि खासगी लॅबमध्ये एका हजारावर दर आकारले जात असल्याने गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या साथरोग उद्भवत आहेत. त्यातच अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव, धूर फवारणीचा अभाव आदी बाबी भर टाकत आहेत. कोरोना नियंत्रणात असला तरी ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, विषमज्वर, डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले. साथरोगावर वेळीच निदान व उपचार व्हावे, याकरिता रक्त नमुने चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. वाशिम शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात मलेरिया चाचणी केली जाते. मात्र, डेंग्यू चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये रक्त तपासणीची वेळ आली आहे. डेंग्यू, मलेरिया चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ११०० ते १४०० रुपयांदरम्यान दर आकारणी केली जाते. ही रक्कम सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकजण चाचणी करण्याचेही टाळत असल्याचे दिसून येते. कोरोनाकाळात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना चाचणीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली. ऑक्सिजन प्लांटही साकारले आहेत; या पार्श्वभूमीवर डेंग्यू चाचणीसाठी जिल्ह्यातच प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध झाली तर रुग्णांची गैरसोय टळणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष द्यावे, असा सूर जिल्हावासीयांमधून उमटत आहे.
डेंग्यू चाचणीचा अहवाल येण्यास विलंबडेंग्यू चाचणीसाठी वाशिम येथे रक्त नमुने घेतल्यानंतर अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेत रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. दोन ते चार दिवसांनी या नमुन्याचा अहवाल प्राप्त होतो. या दरम्यान रुग्णावर कोणता उपचार करावा? असा पेच डॉक्टरांना पडतो.
लॅबमध्ये समान दर का नाहीत?विविध प्रकारच्या रक्त नमुने चाचण्यांसाठी शहरातील प्रत्येक लॅबमध्ये वेगवेगळे दर आकारले जातात. त्यामुळे रुग्णांची लुबाडणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक तसेच प्रयोगशाळांनादेखील आर्थिक तोटा होऊ नये म्हणून प्रत्येक लॅबमध्ये एकसमान दर आकारणी व्हावी तसेच दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, असा सूर रुग्णांमधून उमटत आहे.