शेलुबाजार - शेलुबाजार येथील मुख्य चौकात असलेल्या नाल्याला कठडे नसल्याने त्यामध्ये एक दुचाकीस्वार पडला. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी मोटारसायकलवर असलेल्याच दोन मुलींनी वाहनावरुन उडी मारल्याने त्या बालबाल बचावल्या.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील मुख्य चौकात काही दिवसाआधी मोठया प्रमाणात अतिक्रमण होते. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला असला तरी वाहनांची वर्दळ व होत असलेली विस्कळीत वाहतुकीचा फटका आज मोटारसायकलस्वारावर बेतला. पुलावरुन जात असतांना समोरुन आलेल्या वाहनाला जाण्यासाठी जागा देत असतांना नाल्याच्या कडेला सदर इसमाने आपले एम .एच. ३७ एस . ७५६९ क्रमांकाचे वाहन घेतले.
यावेळी बॅलन्स करता न आल्याने सदर इसम दुचाकीसह नाल्यात पडला. यावेळी मागे बसलेल्या दोन्ही मुलींनी उडी मारल्याने त्या बचावल्या. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी इसमाला बाहेर काढले. सार्वजनीक बांधकाम विभागाने पुढाकार घेवून या नाल्यावर कठडे बसविणे गरजेचे झाले आहे. यापूर्वीही एक जण या नाल्यामध्ये पडून जखमी झाल्याची घटना घडली होती.