वाशिम : आगामी कारंजा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पार्सल उमेदवार न देता स्थानिक उमेदवार द्यावा, त्याचेच आम्ही काम करू, असा निर्धार महाआघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ३० जून रोजी मानोरा येथील मासुपा महाविद्यालयात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, यावर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीला तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, आतापासून निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून बाहेरच्या काही उमेदवारांनी गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. यावर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तातडीने ३० जून रोजी संयुक्त बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अरविंद पाटील इंगोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, प्रदेश सरचिटणीस डॉ.शाम जाधव, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड ,उध्दवसेनेचे अनिल राठोड, तालुका प्रमुख रवींद्र पवार, महंत सुनील महाराज, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मत मांडले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून स्थानिक उमेदवारच द्यावा, अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले. पार्सल उमेदवार दिल्यास निवडणुकीत त्यांचे काम न करण्याचा इशाराही देण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून, इच्छूक असलेल्या बाहेरच्या उमेदवारांची पंचाइत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
... तर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही
कारंजा विधानसभा मतदारसंघात मानोरा व कारंजा तालुक्याचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यात सध्या तालुक्याबाहेरचे उमेदवार निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेत आहेत. मात्र त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमास महाविकास आघाडीचे कोणतेही स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत असेही यावेळी ठरविण्यात आले.