लोकमत न्युज नेटवर्कतळप : महाराष्ट जीवन प्राधिकरण योजनेच्या मानोरा तालुक्यातील २८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये तळप गावाचा समावेश आहे; परंतु या गावामधील मजीप्राची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे . त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या घरी पाणी पोहचत नाही. याबाबत मजीप्राच्या कारंजा विभागाला माहिती देऊनही कार्यवाही केल्या जात नाही. तालुक्यातील २८ गावांतील पाणी समस्या सोडविण्यासाठी सदरहू योजना अस्तित्वात आणण्यामध्ये तळप बु. गावाचा समावेश असताना ही योजना १३ गावांपुरतीच मर्यादित असून, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गावातील पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असताना व संबंधित विभागाला माहिती देऊनही पाइपलाइन दुरुस्त केल्या जात नाही. परिणामी, घाण पाणी पाइपलाइनमध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही नागरिकांकडे दोन वर्षांपासून पाणीपट्टी थकीत आहे; परंतु हे थकीत बिल वसूल करण्यासाठी ठोस कारवाई होताना दिसून येत नाही.
गावामध्ये मजीप्राची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटली आहे. संबंधित विभागाला कळवूनही पाइपलाइन दुरुस्त केल्या जात नाही. - भगवान राठोड,उपसरपंच तळप.