सुनील काकडे,वाशिम : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या हवामान बदलासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वाशिम येथील नारायण सोळंके व त्यांचा मुलगा वेद सोळंके यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून पेपर प्रेझेन्टेशन सादर केले. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली असून बापलेकाचे सर्वच स्तरातून काैतुक होत आहे.
वातावरण बदलाचा उद्रेक रोखण्याच्या उद्देशाने १९९५ पासून दरवर्षी ‘कोप’चे (कॉन्फरेन्स ऑफ पार्टीज) आयोजन करण्यात येते. यावर्षी ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत ही आंतरराष्ट्रीय परिषद दुबई येथे पार पडली.
जागतिक तापमान वाढ रोखण्याच्या दृष्टीने पॅरिस करारात घेण्यात आलेल्या निर्णयांवर पावले उचलण्यात यावी, सरासरी तापमान वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ डिग्री सेल्सीयसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न व्हावे, यासाठी दुबई येथील आंतरराष्ट्रीय परिषदेला अनन्य साधारण महत्व होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऋषी सुनक, राजा चार्ल्स तिसरा, कमला हॅरिस यासह जगभरातील बहुतेक सर्वच देशातील विद्यमान मंत्री, पर्यावरण तज्ज्ञ, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. या परिषदेत मुख्यत्वे हवामान बदल, अनुकूलता आणि त्यासाठी विविध क्रियांना लागणारा वित्तपुरवठा, अपारंपरिक ऊर्जेची अंमलबजावणी, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, गरीब देशांना नुकसान भरपाई देणे या मुद्यांचा समावेश होता.
दरम्यान, ‘युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी’ या संस्थेचे प्रतिनिधित्व करून नारायण व त्यांचा मुलगा वेद सोळंके या दोघांना परिषदेत सहभागी होण्याचीच नव्हे; तर विचार व्यक्त करण्याची देखील संधी देखील मिळाली.बापलेकांनी चर्चासत्रात नोंदविला सहभाग :
आठवडाभर चाललेल्या परिषदेत नारायण सोळंके यांनी शाकाहार या विषयी झालेल्या चर्चासत्रात सहभाग नोंदविला; तर त्यांचा मुलगा वेद याने यूथ पवेलियनमधून शाश्वत शेतीविषयीचा प्रकल्प टेड-एक्स स्वरूपात मांडला. दोघांनीही मांडलेले विचार ‘यूएन’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, हे विशेष.