लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला बहुतांशी यश मिळाले; मात्र सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. संपर्कातील ‘हाय रिस्क’ असलेल्या सहा व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून २५ व्यक्तींना ‘होम क्वॉरंटीन’ करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.कवठळ येथील कोरोनाबाधीत रुग्णास मधुमेहाचा आजार जडलेला असून त्याला यापूर्वी पक्षाघात आणि ह्रदयविकाराचा झटका देखील आलेला आहे. त्यामुळे त्यास व्यवस्थितरित्या चालता, फिरता येत नव्हते. २८ मार्चपासून प्रकृती अधिकच खराब झाल्याने सदर इसमाने अकोला येथील सिटी हॉस्पिटल गाठले; मात्र होणारा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ५ मे ते ७ मे पर्यंत गावी राहून ८ मे रोजी वाहनाने सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयास सदर रुग्ण उपचारार्थ दाखल झाला. ९ मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. दरम्यान, त्याच्यासोबत त्याचा मुलगा, पुतण्या आणि वाहन चालक असे तीन लोक गेले होते. यासह घरातील आणखी दोनजण व न्हावी असे एकूण ६ लोक ‘हाय रिस्क’ संपर्कातील असून संबंधित सर्वांना वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील व्यक्ती वर्ध्यात ‘कोरोना पॉझिटिव्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:05 PM