वाशिम : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी (ता. अंबड) येथील घटनेच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज व सर्वधर्मियबांधवांच्यावतीने वाशिम व मंगरूळपीर शहरात कडकडीत बंद पाळला.
अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षणासाठी संवैधानिकरित्या आंदोलन सुरू असताना, पोलिस प्रशासनाकडून मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद गत तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उमटत आहेत. सलग चौथ्या दिवशीही या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटले असून, ५ सप्टेंबर रोजी वाशिम व मंगरूळपीर शहर बंदचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. बंदमुळे वाशिम व मंगरूळपीर शहरात शुकशुकाट दिसून आला. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला.