- संतोष वानखडेवाशिम - जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी ३,९९८ मतदारांपैकी ३८६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजतापासून वाशिम व मानोरा येथे मतमोजणीला प्रारंभ झाला.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ५८, तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुकीत ५५ मिळून एकूण ११३ उमेदवार रिंगणात होते. यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत २७०८ मतदारांपैकी २६४२ मतदारांनी (९७.५६ टक्के), तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १२८० पैकी १२२६ (९५.७८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वाशिम बाजार समितीत सकाळी १०:२० वाजेपर्यंत जाहिर झालेल्या निकालानुसार चक्रधर गोटे, डॉ.सुधीर कवर व डॉ. सिद्धार्थ देवळे पॅनलचे सुभाष राठोड व सविता काटेकर असे दोन उमेदवार विजयी झाले तर चंद्रकांत ठाकरे, सुरेश मापारी पॅनलचे रेखा सुरेश मापारी व प्रमिला इढोळे असे दोन उमेदवार विजयी झाले.
मानोरा बाजार समितीत व्यापारी/अडते मतदार संघात विजय राठी व अरुण हेडा ( महाविकस आघाडी) विजयी झाले. हमाल/मापारी मतदार संघात अपक्ष अनिस शेख, सेवा सहकारी ओबीसी मतदार संघात अभिजीत पाटील, सेवा सहकारी संघात ( व्हि.जे.एन.टी. ) माणिक पवार (महाविकास आघाडी) तर सेवा सहकारी संस्था (महिला राखीव) गटात इंदूबाई नीलकंठ इंगोले (भाजपा) विजयी झाल्या.