लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): रविवारी गारपिट व अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यातील २५ गावांना झोडपून काढले. आमदार अमित झनक यांनी तालुक्यातील गारपिटग्रस्त गावांना भेटी देऊन महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, अशा सूचना दिल्या.
तालुक्यात गारपिटमुळे झालेल्या शेतातील पिकांच्या नुकसानाची पाहणी आमदार अमित झनक यांनी केली. गारपिटमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकामध्ये गहु, हरभरा, आदींचा समावेश आहे. फळबागांनादेखील फटका बसला आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीट व अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. सन २०१७ मध्ये अल्प पावसामुळे शेतक-यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. आता गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने २५ गावांतील पिकांचे नुकसान झाले. महागाव , गोहगाव, बाळखेड, करंंजी, लेहणी, वडजी, नेतन्सा, अंचळ, केनवड व गणेशपुर या भागाची पाहणी आमदार अमित झनक यांनी केली आहे. शेतक-यांना भरघोष स्वरुपात नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी झनक यांनी केली. यावेळी तहसीलदार राजु सुरडकर, डॉ.संतोश बाजड, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.