लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत घरकुल योजनेची कामे करण्याकरिता लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मंजूर झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राप्त अनुदानातून घरकुल लाभार्थीसह घरकुलाची कामे करणार्या मजुरांचा मोबदला अदा करण्यासाठी जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांनी त्यांच्याकडे मंजूर रक्कम स्टेट बँकेकडे वळती केली आहे. या प्रक्रियेला अडीच महिने झाली तरी घरकुल लाभार्थींसह तब्बल ३६७५ मजुरांच्या खात्यात ही रक्कम स्टेट बँकेने अद्यापपर्यंत जमाच केली नाही. विविध शासकीय योजनेंतर्गत शासनाकडून मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना घरकुल मंजूर करण्यात येते. या घरकुलांची कामे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येत असते. यामध्ये संबंधित लाभार्थीला या कामात स्वत: सहभाग घ्यावा लागतो आणि त्यासाठी त्याचे जॉबकार्ड तयार करण्यात येते. लाभार्थीसह पाच ते सहा मजुरांकडून घरकुलाचे काम करण्यात येते आणि या कामाचा मोबदला म्हणून संबंधित लाभार्थी कुटुंबातील मजूर आणि इतर मजुरांना शासनामार्फत मजुरी मंजूर केली जाते. साधारण एका आठवड्याचे २४00 रुपये प्रत्येक घरकुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दिले जाते. आता जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पंचायत समित्यांच्यावतीने घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी व इतर मजुरांना देय असलेली मोबदल्याची रक्कम जवळपास अडीच महिन्यांपूर्वी स्टेट बँकेकडे वळती केली आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील मिळून ६ हजार ६७५ लाभार्थी व मजुरांच्या खात्यात स्टेट बँकेने ही रक्कम वळती केली नाही. यामुळे घरकुल लाभार्थींसह या घरकुलांची कामे करणार्या मजुरांवर मात्र उपासमारीची पाळी आली आहे.
नरेगाच्या कामांच्या अहवालाची पाहणी करून बँकेकडे असलेल्या प्रलंबित रकमेबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे चौकशी करू व त्यांना याप्रकरणी संबंधित बँकेच्या शाखेवर कारवाई करण्याची सूचना करू.- सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी वाशिम (रोहयो)
घरकुल योजनेचे लाभार्थी व या योजनेत घरकुलाचे काम करणारे मजूर मिळून तालुक्यातील ३00 हून अधिक कामगारांचा मोबदला बँकेकडे पंचायत समितीने वळता केला आहे. तो अद्यापही बँकेकडून लाभार्थी आणि मजुरांच्या खात्यात वळता केला नाही. याप्रकरणी संबंधित बँकावर कारवाई करावी.-गजानन भवाने,सदस्य, पंचायत समिती मानोरा