वाशिम - रिसोड तालुक्यातील येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा हद्दपार करून जुमडा बॅरेजमध्ये समाविष्ठ करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळताच शेतकरी आक्रमक झाले. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली जाईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे रिसोड-मालेगाव विधानसभा अध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी मंगळवारी दिली.येवती येथील पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, सध्या या बंधारा काही ठिकाणी नादुरूस्त आहे.
बंधारा दुरूस्त करणे तसेच नवीन गेट टाकून मिळण्याची मागणी यापूर्वी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. येवती येथील कोल्हापुरी बंधा-याची पाणी साठवण क्षमता 9 गेटची असून, सद्यस्थितीत जुमडा बॅरेजमुळे त्याची क्षमता केवळ ४ गेटवर येणार आहे. हा कोल्हापुरी बंधारा झाल्यापासून या क्षेत्रातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ हजारो शेतक-यांना अनेक वर्षापासून होत आहे.
अलिकडच्या काळात या बंधा-याची कोणत्याही प्रकारे देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. तसेच यापुढे देखभाल दुरूस्ती होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने शेतक-यांना सांगितले. यामुळे शेतक-यांचा संभ्रम वाढला असून, या बंधा-याची दुरूस्ती व गेट टाकण्याची मागणी शेतक-यांनी लावून धरली. येवती परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना वरदान ठरलेला व परिसरातील जलपातळी वाढविण्यास उपयुक्त असलेला हा कोल्हापुरी बंधारा गावक-यांसाठी आवश्यक आहे, अशी भूमिका बाबुराव शिंदे यांच्यासह गावक-यांनी घेतली. या बंधा-याच्या पुनरुज्जीवनाकरिता शासनस्तरावर प्रस्ताव सादर करावा, बंधा-याची दुरूस्ती करावी यासह हा बंधारा खरोखरच जुमडा बॅरेजमध्ये समाविष्ठ करण्याच्या हालचाली सुरू आहेत का? यासंदर्भात शेतकरी लवकरच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करणार आहेत, असे बाबुराव शिंदे यांनी सांगितले.