लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विद्यमान खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक यांच्यासह इतर पदाधिका-यांनी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसला मंगळवारी भेट देवून उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील शेतक-यांनी उपस्थिती दर्शवून लोकप्रतिनिधींसमक्ष केवळ विजेअभावी सिंचन करता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर येत्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार लखन मलिक यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवरील अकराही बॅरेजेसची कामे पूर्ण झाल्याने ७ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिन सिंचनाखाली आली आहे. मात्र, जोपर्यंत परिसरात विजेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत बॅरेजेसमधील पाण्याचा सिंचनाकरिता वापर होणे अशक्यच आहे. याशिवाय यंदा अपु-या पर्जन्यमानामुळे सर्वच बॅरेजेसमधील पाणी आरक्षित करण्यात आल्याने विजेची पर्यायी व्यवस्था करून पाणी घेऊ इच्छिणा-या शेतक-यांना सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. एकूणच या सर्व मुद्यांवर परिसरातील शेतक-यांनी खासदार गवळी, आमदार मलिक यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशनात बॅरेजेस परिसरात विज सुविधा उभारण्याकरिता महावितरणने शासनाकडे पाठविलेल्या ६५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरात मिळवून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार मलिक यांनी दिली.
या भेटीत लोकप्रतिनिधींनी जुमडा, कोकलगाव, आडगाव, गणेशपूर ढिल्ली, राजगाव आदी बॅरेजेसमधील उपलब्ध पाण्याची पाहणी केली. यावेळी खासदार गवळी, आमदार मलिक यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष बंडू पाटील महाले, प्रदेश चिटणीस नितेश मलिक, शहराध्यक्ष धनंजय हेन्द्रे व भाजपा-सेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.