- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वर्षभरापेक्षा अधिक कालावधीतपासून ठाण मांडून आहे. एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या कालावधीत कोरोना संसर्गाने एकूण ५८९ जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्यावर वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या सहा नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावर नगर पालिकांनी ३२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याची माहिती आहे.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्गाने बाधित पहिला व्यक्ती आढळला होता. तेव्हापासून आजतागायत कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळलेले नाही. संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिभयंकर ठरली. पहिल्या लाटेत ७३३९, तर १५ फेब्रुवारी ते ३ जून या कालावधीत ३३ हजार १४ नागरिक संसर्गाने बाधित झाले. पहिल्या लाटेत १५६ आणि दुसऱ्या लाटेत ४३१ अशा एकंदरीत ५८७ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाने कुठल्याही व्यक्तीचा शासकीय अथवा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्लास्टिक पिशवीत पॅक करून मृतदेहावर स्थानिक नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या पाच पीपीई किट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपलब्ध करून दिल्या जातात, तर मृतदेह जाळण्याकरिता लागणारे लाकूड, गोवऱ्या आणि डिझेलचा खर्च करण्याची जबाबदारी नगरपालिकांकडे सोपविण्यात आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार नगर पालिकांच्या फंडातून कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली जात असून वाशिम नगर पालिकेने ३५४ मृतदेहांवर, कारंजात ५१, रिसोडात ७; तर मंगरूळपीर येथे ३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
वाशिममध्ये ५५४ मृतदेहांना चिताग्नीजिल्ह्यातील वाशिम नगरपालिकेने गेल्या वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या ५५४ व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले असून, त्यातील ३६१ मृत्यू शासकीय रुग्णालयात, तर १९३ मृत्यू खासगी दवाखान्यांमध्ये झालेले आहेत. नगरपालिकेने प्रत्येकी एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावर पाच ते साडेपाच हजारांचा खर्च झाल्याचे दर्शविले आहे. त्यात चार क्विंटल लाकूड, ७०० गोवऱ्या, दोन सर्जीकल पीपीई कीट आणि पाच लिटर डिझेल आदी साहित्याचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.
कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या फंडातून हा खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यांनी नियमानुसारच खर्च करणे अपेक्षित आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. - शन्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम