सुनील काकडे, वाशिम : शहरातील पुसद नाकास्थित व्यापारी संकुलातील दुकानाचा रजिस्टर भाडेपट्टा करण्यासाठी तक्रारदारास १० हजार रुपयांची लाच मागून ७ हजार रुपये स्वीकारताना वाशिम नगर परिषदेच्या सहायक मिळकत व्यवस्थापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने २ ऑगस्ट रोजी रंगेहात अटक केली.
‘एसीबी’कडून प्राप्त माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी झालेल्या पडताळणी कारवाईदरम्यान या प्रकरणातील तक्रारदारास नगर परिषदेचा सहायक मिळकत व्यवस्थापक वैभव देविदास पांडे याने पुसद नाका परिसरातील महात्मा गांधी विद्यालयानजिक बांधलेल्या ३ मजली व्यापारी संकुलातील दुकानाचा भाडेपट्टा नावे करण्यासाठी शासकीय पावती शुल्क १५ हजारांव्यतिरिक्त १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडअंती ७ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी संबंधिताने दर्शविली.
दरम्यान, ठरल्यानुसार २ ऑगस्ट रोजी सापळा कारवाईदरम्यान वैभव पांडे याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या चमूने त्यास तत्काळ ताब्यात घेतले. संबंधितावर वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई सापळा व तपास अधिकारी तथा एसीबीचे पोलिस उपअधिक्षक गजानन शेळके, पोहवा नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे, योगेश खोटे, संदिप इढोळे आदिंनी केली.