वाशिम: ‘सायलेन्स झोन’सह अनावश्यक वेळी अकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांवर यापुढे उपप्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून शुक्रवारी देण्यात आली.
रस्त्यावर धावणाºया अनेक वाहनांचे चालक गरज नसताना आणि सायलेंस झोन परिसरात मोठ्याने हॉर्न वाजवितात. यामुळे ध्वनी प्रदुषण वाढत असून, त्याचा परिणाम पर्यावरणासह आरोग्यावरही होत आहे. शासनाने ही बाब लक्षात घेऊन सायलेंस किंवा प्रतिबंधित झोनमध्ये हॉर्न वाजविणाऱ्या आणि रस्त्यावरही अकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या अंतर्गत प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनधारकांसह नागरिकांना ध्वनीप्रदुषण नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनांतर्गत हॉन कोठे, कधी आणि किती प्रमाणात वाजवायचा त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. यानंतरही सार्वजनिक आणि सायलेंस झोनमध्ये गरज नसतानाही मोठ्याने हॉर्न वाजविणारी वाहने आढळल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदुषण नियमावलीतील हॉर्न वाजविण्या संदर्भात असलेल्या कलम १९० मधील पोट कलम १७७ आणि ११९ अंतर्गत वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार रुपये प्रति वाहन असा दंडही आकारण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची यंत्रणा कार्यरत राहणार असून, शहरांतर्गत यासाठी वाहतूक पोलिसांनाही अधिकार देण्यात येणार आहेत.
नागरिकांना ध्वनी प्रदुषण नियंत्रणाची शपथ
वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदुषण किती घातक आहे आणि त्यामुळे कोणत्या अडचणी येऊ शकतात. याची माहिती देऊन नागरिकांना ध्वनी प्रदुषणापासून परावृत्त करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये नागरिकांना ध्वनी प्रदुषण नियंत्रणाची शपथ देण्यात आली. यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.