लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याबाबत पाणीटंचाईग्रस्त गावांनी उदासिनता बाळगली असून ५ फेब्रुवारीपर्यंत विहिर अधिग्रहणाचे केवळ ५ प्रस्ताव सादर झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली.पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार नळ दुरूस्तीच्या ५ उपाययोजना, टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरविण्याच्या ७४ उपाययोजना आणि खासगी विहिर अधिग्रहणाच्या ४९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ५ फेब्रुवारीपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावांमधून विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात एकट्या मानोरा तालुक्यातील चार प्रस्ताव असून कारंजा तालुक्यातील एका गावाचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून ग्रामीण भागातील प्रशासन पाणीटंचाईसंदर्भत किती जागरूक आहे, याची प्रचिती येत आहे.
विहिर अधिग्रहण अथवा टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांनी विनाविलंब आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम