- दिनेश पठाडेवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यास दिरंगाई केली. अशा लाभार्थींची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क केले जाणार असून अशा लाभार्थीना योजनेतून बाद केले जाणार आहे.
पी.एम. किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी पात्र लाभार्थींना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग होतात. योजनेचे आतापर्यंत १३ हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पी.एम किसानच्या नोंदणीकृत लाभार्थींना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न करण्याचे काम चालू आहे. ही कामे करताना क्षेत्रिय स्तरावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच ज्या पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न केलेली नाही. अशा लाभार्थींची नोंद घेऊन पोर्टलवर अपात्र करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने तहसील, जिल्हा स्तरावर ज्या पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही उपरोक्त प्रक्रिया पूर्ण न केलेले आणि मयत लाभार्थी यांना पी.एम. किसान पोर्टलवर अपात्र मार्क करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरुन याद्या सादर केल्या आहेत. या याद्यांवर २६ जूनपूर्वी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पी.एम किसान योजनेचे उपआयुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी २२ जून रोजी सर्व नोडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
१५.४२ लाख लाभार्थींचे केवायसी शिल्लकराज्यात पी.एम. किसान योजनेचे ९९ लाख ५ हजार ७०५ सक्रिय लाभार्थी आहेत. २२ जूनपर्यंत ८३ लाख ६२ हजार ८४३ लाभार्थींनी केवायसी पूर्ण केले आहे. तर १५ लाख ४२ हजार ८६२ लाभार्थींचे केवायसी प्रलंबित आहे.
९.७१ लाख लाभार्थीचे आधार सिडिंग प्रलंबितराज्यातील ९६ लाख ५४ हजार ७७३ लाभार्थींपैकी ८६ लाख ४० हजार २५९ शेतकऱ्यांनी आधार सिडिंग पूर्ण केले आहे. ९ लाख ७१ हजार ५२२ लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे शिल्लक आहे.